सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाने 1955 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत साकारलेले दुर्मिळ तैलचित्र आजही जतन करून ठेवले आहे. जयंती उत्सवात केवळ बुद्ध-भीम गीतांनाच स्थान देत मंडळाने वर्षानुवर्षे विधायक आणि प्रेरणादायी परंपरा जपली असून हे तैलचित्र आजही समाजाला ऊर्जा देणारे केंद्र ठरत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मंडळाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ असे असून या मंडळाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 1955 साली हुबेहूब काढलेले तैलचित्र आहे. आजही या मंडळाकडे हे तैलचित्र सुरक्षित आहे. हे तैलचित्र त्याकाळचे सोलापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार उमेश्वर पोरे यांनी साकारले होते. सोलापुरात उर्जादायी असे हे तैलचित्र आहे. भीम जयंती निमित्त येथील मंडपामध्ये याच तैलचित्राची प्रतिष्ठापना करण्यात येते. आजही सर्वांना हे तैलचित्र प्रेरणा आणि ऊर्जा देत आहे.
सोलापूर ही प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने क्रांतिप्रवण झालेली नगरी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेकवेळा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आले होते. त्यांनी येथील जनतेत जागृती करण्याचे काम केले. त्यांनी समाजाला एक नवा संदेश देऊन ऊर्जा निर्माण केली होती. त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजात स्वाभिमान जागृत करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूर शहराचा एक वेगळा ऋणानुबंध आहे. त्याच अनुषंगाने सोलापूरचे त्याकाळचे प्रसिद्ध चित्रकार उमेश्वर पोरे यांनी 1955 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हुबेहूब तैलचित्र रेखाटले होते. ते चित्र आजही जपून ठेवण्यात आले आहे.
भीमगीताशिवाय दुसरी कोणतीच
गाणी लावली जात नाहीत
हे मंडळ जुने मानले जाते. आजही या मंडळाच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती उत्सव साजरा केला जातो. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाने विधायक आणि प्रेरणादायी जयंती उत्सवाची परंपरा आजही कायम जपली आहे. येथे तथागत बुद्ध आणि भीमगीताशिवाय दुसरी कोणतीच गाणी लावली जात नाहीत. शिस्तबद्ध स्वरूपात मंडळाचे पावित्र्य राखले जाते. या मंडळाच्या वतीने विविध उपक्रमही राबविले जातात.
मानाचे मंडळ म्हणून मिरवणुकीत
शेवटी सहभागी होत असे
पूर्वी काळी सोलापूर शहरात विविध मंडळांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जात असे. या मिरवणुकीत मानाचे मंडळ म्हणून सर्वात शेवटी हे मंडळ मिरवणुकीत सहभागी होत असे. सध्या या मंडळाकडून मिरवणूक काढण्यात येत नाही. या मंडळाच्या वतीने सुरुवातीच्या काळात लेझीम स्पर्धा,टिपरी स्पर्धा,त्याचबरोबर इतर स्पर्धा घेण्यात येत होत्या. लेझीम स्पर्धा आणि टिपरी स्पर्धा त्याकाळी प्रतिष्ठेची मानली जात होती. त्याकाळी या स्पर्धेत शहर आणि जिल्ह्यातून अनेक मंडळे सहभागी होत असत.
नव्या पिढीतील कार्यकर्ते सांभाळत आहेत धुरा
अलीकडच्या काळात नवे निर्बंध आणि काळानुरूप बदल झाले तरीही या मंडळाने जयंतीचा पारंपारिक वारसा जपला आहे. दिवंगत दऱ्याप्पा जाधव, दिवंगत भारतभाऊ सुतकर , दिवंगत ज्ञानेश्वर बागले, दिवंगत जनार्दन बनसोडे तसेच शांताराम रणशृगारे, भीमराव बनसोडे यांच्यासह जेष्ठ मंडळींनी या मंडळाच्या उभारणीसाठी मोठे योगदान दिले. सध्याच्या काळात या मंडळाची धुरा नव्या पिढीतील सतीश सरवदे, किरण जाधव, रवींद्र तळभंडारे, सुधीर तळभंडारे, बाळू गायकवाड, सिद्धार्थ तळभंडारे, मनीष तळभंडारे आणि कार्यकर्ते मोठ्या उमदीने सांभाळत आहेत. डॉ. शैलेश सुरते, ॲड. राज बनसोडे, किरण बनसोडे यांच्यासह अनेकजण अभिवादनासाठी दरवर्षी आवर्जून उपस्थित असतात.



























