बार्शी – बार्शी तालुक्यातून प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी करण्यासाठी मालेगाव येथे आलेल्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत अधिकाऱ्यांना कोणतीही मोजणी न करु देता परत पाठवले.
शक्तीपीठ महामार्गामुळे बार्शी तालुक्यातील अनेक शेतकरी बाधित होणार असून, त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. महामार्गासाठी जमिनी संपादित झाल्यास मिळणारा मोबदला हा शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी पुरेसा ठरणार नसल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका यावेळी कृष्णराज बारबोले यांनी मांडली.
शक्तीपीठ महामार्गाला आमचा कायम विरोध आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी घेतल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा आणि भवितव्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी या महामार्गास विरोध कायम राहील, अशी भूमिका बारबोले यांनी व्यक्त केली.
मालेगाव येथे जमीन मोजणीसाठी अधिकारी दाखल झाल्याची माहिती मिळताच परिसरातील बाधित शेतकरी एकत्र आले. शेतकऱ्यांची एकजूट आणि तीव्र विरोध पाहता संबंधित अधिकाऱ्यांना मोजणीची प्रक्रिया न करताच परतावे लागले.
यावेळी बारबोले यांनी भविष्यात बार्शी तालुक्यातील इतर गावांमध्येही शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी करण्यासाठी अधिकारी आल्यास शेतकऱ्यांच्यावतीने त्याला विरोध करण्यात येईल, असा इशारा दिला.
या आंदोलनावेळी राजेश निंबाळकर, बालाजी पैकेकर, भारत बाप्पा देशमुख, शिवशंकर ढवण, प्रथमेश गवळी, अनिरुद्ध माने यांच्यासह मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे मालेगावातील जमीन मोजणीची प्रक्रिया तूर्तास होऊ शकली नाही.
Post Views: 5