उमरगा – उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल हरीदास गरड-जाधव यांना शासकीय कामात अडथळा निर्माण करत, खात्यांतर्गत चौकशी व बडतर्फ करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रफुल श्रावण गायकवाड (रा. औराद) व ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव (रा. तुरोरी) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम 132, 74, 308(2) व 3(5) अन्वये मंगळवारी (दि. 28 जुलै) रात्री 11.33 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
फिर्यादीनुसार, दि. 20 जुलै 2026 रोजी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान डॉ. कोमल गरड या रुग्णालयातील आपल्या कक्षातून बाहेर पडत असताना आरोपींनी त्यांना अडवून रुग्णालयातील जनरेटरसाठी वापरण्यात येणाऱ्या डिझेलबाबत माहितीची मागणी केली. त्यावर संबंधित माहिती अधिकृत प्रक्रियेनुसार कार्यालयात अर्ज करून घेण्यास सांगण्यात आले.
यावर प्रफुल गायकवाड याने, “आरोग्य विभागाच्या उपसंचालक रेखा गायकवाड या माझ्या नातेवाईक आहेत. माहिती दिली नाही तर तुमची चौकशी लावून नोकरी घालवतो, बडतर्फ करायला लावून धिंड काढतो,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर आरोपींनी रुग्णालयातील कर्मचारी फुलसुंदर व जनाबाई कुंभार यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून कपाटातील डिझेलचे रजिस्टर बळजबरीने काढण्याचा व त्याचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, आरोपींनी डॉ. गरड यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दमदाटी करणे, विनयभंग व हातापाई केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर डॉ. कोमल गरड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून 28 जुलै रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत भराटे पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 10