टेंभुर्णी – सोलापूर जिल्ह्यात ऊसदराच्या मागणीवरून गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊसदराची घोषणा केली आहे. दहा टक्के साखर उतारा गृहीत धरून पहिली उचल प्रतिटन ३२५० रुपये देण्यात येणार असून, त्यानंतर आणखी १०० रुपये आणि साखरेची विक्री ४५ रुपयांपेक्षा अधिक दराने झाल्यास अतिरिक्त १०० रुपये देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण ३४५० रुपये प्रतिटन ऊसदर देण्याचा निर्णय असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी आमदार बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकरी संघटनेने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रतिटन ३५०० रुपये ऊसदर जाहीर करावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. ऊसदर जाहीर होत नाही तोपर्यंत कारखाने बंद ठेवण्याची आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली होती. जिल्हाधिकारी यांनीही साखर कारखानदार व शेतकरी संघटनांमध्ये समन्वय साधून तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक झाली. दहा टक्के साखर उतारा गृहीत धरून पहिली उचल देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे बबनराव शिंदे यांनी सांगितले.
ज्या साखर कारखान्यांचा साखर उतारा कमी आहे, त्यांना घोषित केलेला दर देणे आर्थिकदृष्ट्या शक्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ऊस तोडणी व वाहतूक खर्च, साखर निर्मिती खर्च, कामगारांचे वेतन, साखरेची रिकव्हरी, साखरेची एमएसपी, बाजारातील साखरेचा दर, इथेनॉलसह अन्य उपपदार्थांमधून मिळणारे उत्पन्न तसेच बँकांकडून साखरेवर मिळणारे कर्ज या सर्व बाबींचा विचार करून ऊसदर निश्चित केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांकडून अनेकदा परिपक्व न झालेला कोवळा ऊस कारखान्याला दिला जातो. त्यामुळे साखर उतारा कमी मिळून कारखान्याच्या उत्पादनावर व आर्थिक गणितावर परिणाम होतो. ऊस पिकाचा परिपक्वतेचा कालावधी साधारण नोव्हेंबरनंतर सुरू होत असल्याने कारखाने १५ नोव्हेंबरनंतर सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी भूमिका बबनराव शिंदे यांनी मांडली. सर्व कारखान्यांनी कोवळ्या उसाचे गाळप टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
साखरेची एसएमपी (किमान विक्री किंमत) वाढविण्याची गरज असल्याचे सांगताना, साखरेच्या एसएमपीच्या आधारे बँकांकडून कारखान्यांना कर्ज दिले जाते. एसएमपी वाढल्यास कर्जाची उपलब्धता वाढून कारखान्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने यंदाही दहा दिवसांच्या अंतराने ऊस बिलाचे पेमेंट करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आतापर्यंत सुमारे १५३ कोटी रुपयांचे पेमेंट करण्यात आल्याची माहिती बबनराव शिंदे यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाचा गळीत हंगाम अत्यंत कमी कालावधीचा होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न कारखान्याच्या माध्यमातून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या हंगामात साखरेला बाजारात अपेक्षित मागणी नसतानाही कारखान्याने शेतकऱ्यांना १०० रुपयांचा अंतिम हप्ता दिला होता. यंदाही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ऊसदर व पेमेंटबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले.
Views: 33