धाराशिव : खरीप २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, पीक विमा योजनेतील तांत्रिक अटींचा आधार घेत बजाज अलायन्स पीक विमा कंपनीने हजारो शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवले होते. या अन्यायाविरोधात तत्कालीन उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा दिला. या लढ्याला अखेर ऐतिहासिक यश मिळाले असून, धाराशिव जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार २८७ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास ६०३ कोटी रुपयांची पीक नुकसानभरपाई मिळवून देण्यात यश आल्याची माहिती ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खरीप २०२० मध्ये धाराशिव जिल्ह्यात एकूण ९ लाख ४८ हजार ९९० शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यापैकी ३ लाख ५७ हजार २८७ शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी विमा उतरविला होता. त्याच वर्षी जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये पुरेशी जनजागृती नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर २४ तासांच्या आत विमा कंपनीला पूर्वसूचना दिली नव्हती. हाच तांत्रिक मुद्दा पुढे करत विमा कंपनीने जिल्ह्यातील केवळ ७९ हजार शेतकऱ्यांना सुमारे ५६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली. त्यामुळे लाखो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते.
शेतकऱ्यांवर झालेला हा अन्याय लक्षात आल्यानंतर ज्ञानराज चौगुले यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या निर्णयानुसार नुकसानभरपाईची रक्कम जवळपास ६०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचत होती.
मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पीक विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात सुरुवातीच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीकडून २०० कोटी रुपये जमा करून घेतले. तसेच जमा झालेली रक्कम आणि जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असलेली रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याचे निर्देश दिले. तरीही उर्वरित रक्कम देण्याबाबत विमा कंपनीकडून विलंब होत असल्याने चौगुले यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.
या अवमान याचिकेसह कंपनीच्या मूळ याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पीक विमा कंपनीचे प्रमुख अमित अग्रवाल यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयात जमा असलेले ७५ कोटी रुपये आणि अन्य उपलब्ध रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले. या सर्व प्रक्रियेतून एकूण ३७६ कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध झाल्याचे चौगुले यांनी सांगितले.
याशिवाय पीक विमा कंपनीचे उच्च न्यायालयात ७५ कोटी रुपये जमा होते, तर राज्य शासनाकडे कंपनीचा १३४ कोटी रुपयांचा हप्ता जमा होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना जवळपास २२७ कोटी रुपये देण्याचे आदेश झाले होते. मात्र, वेळेत रक्कम वितरित न झाल्याने विमा कंपनीने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत चौगुले यांनी सातत्याने लक्ष घातले. दिल्ली येथे प्रत्यक्ष जाऊन प्रकरणाचा अभ्यास केला, सुनावण्यांचा पाठपुरावा केला आणि शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी इंटरव्हेन्शन पिटीशनही दाखल केली.
अखेर सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबर २०२० रोजी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय देत २२७ कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे खरीप २०२० मधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास ६०३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळवून देण्यात यश आले, याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण न्यायालयीन लढ्यात तांत्रिक बाबींची पूर्तता, कागदपत्रांची जमवाजमव आणि योग्य वकिलांची निवड यामध्ये सहकार्य करणारे मतदारसंघातील सहकारी अनिल जगताप यांचे चौगुले यांनी विशेष आभार मानले. उच्च न्यायालयातील प्रकरणात अॅड. श्रीकांत वीर आणि अॅड. सतीश कोळी यांनी मोलाची साथ दिली. तर सर्वोच्च न्यायालयातील तिन्ही याचिकांमध्ये अॅड. अतुल डक यांनी प्रभावी युक्तिवाद करून शेतकऱ्यांची बाजू सक्षमपणे मांडली. त्यांच्या योगदानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या लढ्याला यश मिळाल्याचे चौगुले यांनी नमूद केले.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, त्यांना शासनाच्या आणि विमा कंपन्यांच्या योजनांचा योग्य लाभ मिळावा, यासाठी आपण आणि आपले सहकारी यापुढेही सदैव कटिबद्ध राहणार आहोत, अशी ग्वाही ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खरीप २०२० मधील पीक विम्याचा प्रश्न केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नव्हता, तर विमा कंपनीच्या तांत्रिक आक्षेपांमुळे वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काचा प्रश्न होता. त्यासाठी न्यायालयीन पातळीवर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचा दावा चौगुले यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदमध्ये अनिल जगताप,शिवसेना मा.जिल्हाप्रमुख मोहन पनुरे,अजित पिंगळे,तुळजापूर मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Views: 18