मंगळवेढा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मंगळवेढा आगाराच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या पाच राजमाता जिजाऊ बसेस नव्याने दाखल झाल्या आहेत. या बसेसचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी मंगळवेढा बसस्थानकात आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते फीत कापून उत्साहात पार पडला.
या लोकार्पण सोहळ्यास नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, दत्तात्रय जमदाडे, सोमनाथ आवताडे, दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर, अॅड. रमेश जोशी, अॅड. डी. सी. जाधव, नगरसेवक अजित जगताप, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, नगरसेवक गौरीशंकर बुरकुल, चंद्रकांत घुले, बाबा कोंडूभैरी, नारायण गोवे, ज्ञानेेशर भगरे, समाधान हेंबाडे, मंगळवेढा आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक दत्तात्रय मोरे, स्थानक प्रमुख शरद
वाघमारे, वाहतूक नियंत्रक अशोक चव्हाण यांचेसह एसटी महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार समाधान आवताडे म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणार्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणादायी विचारांचा आणि कर्तृत्वाचा गौरव म्हणून परिवहन महामंडळाकडून राजमाता जिजाऊ बससेवा सुरू करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
सुनेत्राताई पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत मंगळवेढा आगारात पाच नव्या बसेस दाखल झाल्या आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आतापर्यंत शिवनेरी, शिवशाही, शिवाई, हिरकणी आणि यशवंती यांसारख्या विविध सेवांचा समावेश आहे. त्यात आता राजमाता जिजाऊ बससेवेची महत्त्वपूर्ण भर पडली आहे. आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देणार्या या नव्या बसेसमुळे मंगळवेढा आगाराची प्रवासी सेवा अधिक सक्षम होऊन सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक प्रवासी-केंद्रित होण्यास निश्चितच मदत होणार आहे. मंगळवेढा आगाराला मिळालेल्या पाच नव्या बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळेल. असा आशावाद आ. समाधान आवताडे यांनी व्यक्त केला.
Post Views: 3