सोलापूर – अवकाळी वारे आणि वादळाच्या तडाख्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नान्नज गावातील शेतकरी सुरेश विभुते यांची द्राक्षबाग पूर्णपणे कोसळून भुईसपाट झाली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम (काका) साठे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, शेतकऱ्यांवर आलेले हे संकट सुलतानी स्वरूपाचे असल्याची भावना व्यक्त केली.
साठे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक तसेच महसूल प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी शेतकरी सुरेश विभुते यांना धीर देताना साठे म्हणाले की, संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. प्रशासन आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पाहणीवेळी बाजार समितीचे संचालक प्रकाश चोरेकर, माजी सरपंच दिलीप (पप्पू) माने, शत्रुघ्न घोडके, कपिल जानराव, ओम हाक्के (ग्रामपंचायत सदस्य, नान्नज) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नागेश पवार आदी उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे वादळी परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत व योग्य नियोजनाची गरज असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

















