सोलापूर – जिल्हा परिषदेला १५ व्या वित्त आयोगाचा अखेरचा हप्ता म्हणून तब्बल ८५ कोटी रुपये प्राप्त होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, निधीचे वाटप कोणत्या सदस्याला किती करायचे, यावरच प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अद्याप चर्चा सुरू असल्याने विकासकामांना मुहूर्त मिळालेला नाही. विशेष म्हणजे सदस्यांकडून कामांच्या याद्या घेऊन चार महिने झाले असतानाही निधी वितरणाचा अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे ‘निधी खात्यावर, कामे कागदावर’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेत सध्या सत्तेचे समीकरण स्पष्ट असले तरी ८५ कोटींच्या निधीच्या वाटपावरून राजकीय गणित जुळत नसल्याची चर्चा आहे. भाजपचे ३७ सदस्य असून शिवसेना शिंदे गटाचे आठ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ११ सदस्य सत्तेत सहभागी आहेत. याशिवाय इतर पक्षांच्या सदस्यांनीही सत्तेत जाणे पसंत केल्याने निधीचा वाटा नेमका कोणत्या सूत्रानुसार ठरवायचा, यावर पेच निर्माण झाला आहे.
पहिल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून विकासकामांच्या याद्या मागविण्यात आल्या. त्यानंतर निधीवाटपाच्या सूत्रावर चर्चा सुरू झाली. मात्र, तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही या चर्चेला पूर्णविराम मिळालेला नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकारक्षेत्रात निधीवाटपाची प्रक्रिया होत असताना निर्णय लांबत असल्याने सदस्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
एका बाजूला निधीअभावी विकासकामे रखडल्याच्या तक्रारी केल्या जातात; तर दुसऱ्या बाजूला उपलब्ध निधी वेळेत खर्च करण्याची प्रक्रिया संथ असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. निधी खर्चासाठी विलंब झाल्यास कामांच्या निविदा, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष काम सुरू होण्याची प्रक्रिया आणखी लांबण्याची शक्यता आहे.निधी उपलब्ध असूनही त्याच्या वाटपाचा निर्णय लांबत असल्याने आता सदस्यांचा संयम सुटू लागला आहे. त्यामुळे ८५ कोटींच्या निधीचे सूत्र कधी निश्चित होणार आणि प्रत्यक्ष विकासकामांना कधी सुरुवात होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कोट
‘मतदारांना काय उत्तर द्यायचे?’
“कामांच्या याद्या देऊन चार महिने झाले. निधी खात्यावर जमा आहे; मात्र विकासकामांसाठी एक रुपयाही मिळालेला नाही. मतदारसंघातील जनतेला काय उत्तर द्यायचे? जो निर्णय घ्यायचा आहे, तो तातडीने घ्यावा, अशी आमची मागणी आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पत्र दिले आहे; मात्र अजूनही चर्चा सुरू असल्याचे जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी निधीवाटपाच्या विलंबावर नाराजी व्यक्त केली.