सोलापूर : महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, कला, विधी, संस्कृती आणि आठवणी डिजिटल स्वरूपात जतन करून जागतिक पटलावर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या डिजिटल लोकचळवळीत सोलापूर शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, सामाजिक व सांस्कृतिक संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सोलापुरातील विविध मंडळांकडून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात. या समृद्ध वारशाचे दस्तऐवजीकरण होऊन तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, तसेच सोलापूरच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये जगभर पोहोचावीत, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही स्वतः या उपक्रमात सहभाग नोंदवावा. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळे, गृहनिर्माण संस्था, सामाजिक-सांस्कृतिक संस्था आणि नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
असा नोंदवा सहभाग
संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक टाकून प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. गणेश मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या गणेशोत्सवाचा वारसा डिजिटल माध्यमातून जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.
—-
Post Views: 9