जालना : जालना शहर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती तसेच सेवांचे नियमन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘जालना शहर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२६’ या नियमांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. नगर विकास विभागाने बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
९९३ पदांचा आकृतिबंध मंजूर
महानगरपालिका नव्याने स्थापन झाल्यानंतर शासनाने ११ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये एकूण ९९३ पदांचा आकृतिबंध मंजूर केला आहे. राज्यातील महानगरपालिकांचे वर्गीकरण आणि त्यानुसार महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या पदांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आकृतिबंधाच्या आधारे जालना महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम, २०२६ तयार करण्यात आले.
जालना शहर महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ४५७ (३) अन्वये शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या नियमांना शासनाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर महानगरपालिका अधिनियमातील कलम ४५४, ४५५, ४५६, ४५७ (३) व ४६५ अन्वये या नियमांना मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णयात परिशिष्ट १ ते ४ सह ‘जालना शहर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२६’ यांना मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे.




















