बार्शी – पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या जन्मदिनानिमित्त मदिना मशीद जुलूस कमिटी, बार्शी यांच्यावतीने ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस बुधवारी मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि शांततामय वातावरणात पार पडला. कुरआन पठणाने सकाळी सुमारे ९ वाजता जुलूसाला सुरुवात झाली. लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच मुस्लिम समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जुलूसाच्या मार्गावर मदिना मशीद जुलूस कमिटीच्यावतीने आकर्षक सुशोभीकरण, विविध देखावे, खाद्यपदार्थ, मिठाई, भेटवस्तू आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लिम धर्मातील पवित्र स्थळांच्या आकर्षक प्रतिकृती जुलूसाचे विशेष आकर्षण ठरल्या. सजविलेल्या रिक्षा व चारचाकी वाहनांनीही जुलूसात सहभाग घेतला. लहान मुले व युवकांनी आकर्षक पारंपरिक पोशाख परिधान करुन सहभाग नोंदविला.
जुलूसादरम्यान प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जीवन व शिकवणीशी संबंधित घोषणा, पठण करण्यात आले. विविध सामाजिक संस्थांकडून जुलूस मार्गावर मिठाई, पाणी तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार दिलीप सोपल, आमदार राजेंद्र राऊत, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, विजय राऊत, रणवीर राऊत, कृष्णराज बारबोले आणि आर्यन सोपल यांनी जुलूसाच्या मार्गावर मुस्लिम बांधवांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या.
सकाळी ९ वाजता मदिना मशीदपासून सुरु झालेल्या जुलूसाने बार्शी शहरातील प्रमुख मार्गावरुन मार्गक्रमण केले. त्यानंतर मदिना मशीद येथे जुलूसाची सांगता झाली.
यावेळी मदिना मशीदचे इमाम मौलाना अन्वर उल हक यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या आदर्श जीवनाचा संदेश देताना ईमान, संयम, सदाचार, प्रेम, दया आणि मानवतेच्या मार्गाने जीवन जगण्याचे आवाहन केले. देशातील सध्याची परिस्थिती, सर्व समाजांतील शांतता व एकोपा तसेच पावसासाठी विशेष दुवा करण्यात आली.
जुलूसाच्या मागे ‘कोशिश’ची स्वच्छता मोहीम
कोशिश फाउंडेशनच्यावतीने यंदाही जुलूसानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जुलूसाच्या मार्गावर पडलेले कागद, रॅपर, झेंडे व अन्य कचरा गोळा करुन रस्ता स्वच्छ करण्यात आला. ‘पाकीजगी आधा ईमान है’ या संदेशातून स्वतःसोबतच परिसरही स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी ही मोहीम राबविली जाते.
या उपक्रमात रॉनी सय्यद, रियाज काजी, नासिर काजी, मोहसीन सय्यद, फैयाज पठाण, शकील सय्यद, अबू हुरेरा तांबोळी, सरफराज शेख, मुस्ताक शेख, जमीर पाटेवाले, सिकंदर शेख, इरफान शेख, रहेमान शेख, अफजल सय्यद, शोएब बागवान आणि आदम शेख यांनी परिश्रम घेतले.