सोलापूर – विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी वर्गात खडू हातात घेणाऱ्या शिक्षकांच्या हातात सध्या मोबाईल आणि संगणक अधिक दिसू लागला आहे. शासनाच्या विविध योजना, ऑनलाइन पोर्टलवरील माहिती भरणे, अहवाल सादर करणे, छायाचित्रे व व्हिडिओ पाठविणे अशा प्रशासकीय कामांचा वाढता भार शिक्षकांच्या अध्यापनावर परिणाम करीत असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरचा शिक्षक दिन शिक्षक म्हणून साजरा करायचा की ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ म्हणून, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘अपार’ ओळखपत्र नोंदणी, विद्यार्थ्यांच्या नामांकनातील तफावत दूर करणे, दुहेरी नोंदणी दुरुस्ती, यू-डायस व पीएफएमएस अद्ययावत करणे, ‘निपुण प्लस’ची माहिती भरणे, पोषण आहार व गणवेश वाटपाच्या नोंदी, किचन गार्डन, पावसाचे पाणी साठवण व्यवस्था यांसह विविध उपक्रमांचे छायाचित्रे व पुरावे ऑनलाइन पाठविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.
विशेष म्हणजे, अनेक कामांना ‘तातडीचे’ आणि ‘सर्वोच्च प्राधान्य’ असे निर्देश दिले जात असल्याने कोणते काम आधी करायचे, याचा संभ्रम निर्माण होतो. शाळा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या सूचनांपासून दिवसभर ऑनलाइन माहिती भरण्यापर्यंत शिक्षकांचा वेळ खर्च होत असल्याने प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनासाठी उपलब्ध वेळ कमी होत आहे.
‘शिक्षकांना अध्यापनासाठी मुक्त करा’ अशी मागणी आता पुढे येत असून, ऑनलाइन व प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा पर्याय शासनाने गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोट
शिक्षकांना अध्यापन सोडून ऑनलाइन कामांमध्ये गुंतविण्याऐवजी अशा कामांसाठी किमान कंत्राटी पद्धतीने बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करावी. त्यामुळे रोजगारनिर्मितीबरोबरच शासकीय कामकाज गतिमान होईल आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा वेळ देता येईल. असे डी.एड., बी.एड. असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष, प्रशांत शिरगुर यांनी सांगितले.
Post Views: 16