बार्शी – श्रीकृष्ण हे दैवी गुणांनी संपन्न असे सत्य युगातील महाराज कुमार होते. सत्ययुगात आपण सर्वजण सर्वगुणसंपन्न, संपूर्ण निर्विकारी, सोळा कला संपूर्ण व मर्यादा पुरुषोत्तम देवी-देवता होतो. आज परमपिता परमात्मा शिव निराकार ज्योतिर्बिंदू स्वरुपात या सृष्टीवर दिव्य अवतरण करुन ज्ञान मुरलीद्वारे मानवाला मार्गदर्शन करीत आहेत. या ईश्वरीय ज्ञानामुळे बुद्धी, दिव्य गुण, दिव्य शक्ती आणि श्रेष्ठ संस्कारांचा आंतरिक शृंगार होत असून, त्यामुळे जीवन चारित्र्यसंपन्न बनते. आंतरिक शृंगार अविनाशी, तर बाह्य शृंगार विनाशी असतो, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी निशादिदी यांनी केले.
येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्रावर आयोजित गोकुळाष्टमी कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करीत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी संगीतादिदी होत्या.
निशादिदी म्हणाल्या, गोकुळाष्टमीच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलाला श्रीकृष्णाप्रमाणे वस्त्रे परिधान करुन मुकुट, मोरपीस व बासरीने सजवते. या बाह्य शृंगारामुळे मुलांमध्ये आनंद, उत्साह व नवचैतन्य निर्माण होते. मात्र केवळ बाह्य रुप श्रीकृष्णासारखे केल्याने मूल श्रीकृष्णासमान दैवी गुणसंपन्न होत नाही. मुलाने श्रीकृष्णासारखे दैवी गुण आत्मसात करावेत यासाठी आईने प्रथम स्वतःच्या आणि मुलाच्या आंतरिक शृंगाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संगीतादिदी म्हणाल्या, श्रीकृष्ण व गोप-गोपिकांची रासलीला प्रसिद्ध आहे. त्या रासलीलेत सहभागी होण्यासाठी सध्याच्या जीवनात आपण परस्परांमध्ये विचार, स्वभाव व संस्कारांच्या मिलनाची रास करणे आवश्यक आहे. राजयोगाच्या नियमित अभ्यासाने संस्कार मिलनाची ही रास सहजपणे होऊ शकते.
कार्यक्रमात पाचवीतील बालिका अद्विका बारंगुळे व आराध्या जगदाळे यांनी गोपिकांच्या वेशभूषेत, तर चौथीतील बालक लेखराज शिंदे याने श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सहभाग घेतला. त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या गीतावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दोन वर्षांची बालिका गुंजन मोरे हिनेही त्यांच्यासोबत उत्स्फूर्तपणे नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या गीतावर रासलीलेचा आनंद घेतला. भक्तिमय व आनंदमय वातावरणात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली.
Post Views: 5