सोलापूर : सध्या दुष्काळाची गडद छाया व दीड महिन्यापासून मंद्रूपला तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना मंद्रूप गावात ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे पाणी टंचाई अधिक तीव्र झाली आहे.
ग्रामपंचायतीने गावातील विविध वॉर्डांमध्ये बोअर घेऊन पाणी साठवणुकीची व्यवस्था केली आहे. मात्र ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांशी लागेबांधे असणारे नागरिक या साठवण टाक्यांना थेट पाईप लावून बेकायदेशीरपणे पाणी घरी नेत आहेत.
या पाणीचोरीमुळे गोरगरीब व सामान्य नागरिकांना पाणी मिळणे मुश्किल झाले असून, त्यांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी अबाल वृद्धांना भटकंती करावी लागत आहे. शिवाय अशा प्रकारामुळे अनेक वार्डात दररोज वाद-विवाद वाढत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रकार उघडपणे सुरू असतानाही ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याने पाणीचोरी करणाऱ्यांचे धाडस वाढले आहे. पाईप लावून पाणी नेणाऱ्या नागरिकांवर तात्काळ कारवाई करावी आणि सर्व नागरिकांना समान पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
….
चौकट
….
सदस्य व शासकीय कर्मचारी यांचा मनमानी कारभार
….
ग्रामपंचायतीने सर्वच वार्डात बोरवेलच्या माध्यमातून टाकीमध्ये पाणी साठवन केली आहे. अनेक ग्रामपंचायत सदस्य व शासकीय कर्मचारी यांच्याकडून बोरवेलच्या मोटारीलाच पाईप लावून घरी पाणी नेण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत सामान्य नागरिककडून विचारणा केली असता अरेरावीची भाषा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
….
फौजदारी गुन्हा दाखल करणार
….
सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे सर्वत्र तीव्र पाणी टंचाई आहे . त्यामुळे सर्वांना पाणीपुरवठा होईल यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. पाईप लावून पाणी घरी नेताना आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
प्रवीणकुमार घाडगे, प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी, मंद्रूप.
















