सोलापूर : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर व ड्रीम फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कायकवे कैलास’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी, गटनिदेशक, शिल्प निदेशक, कार्यालयीन कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ‘कायकवे कैलास’ या तत्वज्ञानाचा अर्थ “काम हीच पूजा” असा असून प्रामाणिक परिश्रमातूनच यश मिळते,हा संदेश व्याख्यानातून अधोरेखित करण्यात आला.
या कार्यक्रमात वक्ते म्हणून सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतीले (सदस्य, संस्था व्यवस्थापन समिती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर) यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून समाधान हॉस्पिटल, सोलापूर येथील डॉ. मल्लिकार्जुन तरनळ्ळी उपस्थित होते.
प्रमुख वक्त्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची आजच्या औद्योगिक युगातील उपयुक्तता स्पष्ट करत प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य, स्वावलंबन व कार्यनिष्ठेचे महत्त्व पटवून दिले. उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्य, गुणवत्ता व सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विविध उद्योजकांनी आपले अनुभव मांडत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोजगाराच्या बदलत्या संधी व उद्योजकतेचे महत्त्व यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. “नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे बना” असा संदेश त्यांनी दिला.

























