जेऊर – केम (ता.करमाळा) येथे कुंकू कारखान्यांची पाहणी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार तथा विधान परिषद आमदार मा. हेमंत पाटील साहेब व परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील साहेब यांनी भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड मॅडम, करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम साहेब, ग्रामसेवक वैभव तळेकर यांच्यासह कुंकू कारखानदार व केम ग्रामस्थ उपस्थित होते.
केम गावाला कुंकू उत्पादनाची ऐतिहासिक व पारंपरिक ओळख असून गावात सुमारे २५ कुंकू कारखाने कार्यरत आहेत. या उद्योगातून सुमारे ३०० ते ४०० नागरिकांना रोजगार मिळत आहे. मात्र, रस्त्यांची दुरवस्था, रेल्वेची बंद झालेली पार्सल सुविधा, प्रलंबित MIDC प्रकल्प तसेच इतर शासकीय विभागांच्या अटी-शर्तींमुळे उद्योगांच्या विकासाला अडथळे निर्माण होत असल्याचे ग्रामस्थ व कारखानदारांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी केमला जोडणारे प्रमुख रस्ते सुधारावेत, MIDC प्रकल्पाला गती मिळावी, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत तसेच केम रेल्वे स्थानकावर अधिक रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आणि रेल्वे पार्सल सुविधा पुन्हा सुरू करावी, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.
या सर्व प्रश्नांची दखल घेत आमदार हेमंत पाटील साहेब यांनी केमच्या उद्योग व विकासाशी संबंधित प्रश्न उद्योगमंत्री मा. उदय सामंत साहेब यांच्या निदर्शनास आणून देऊन उपलब्ध सुविधांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. केम गावात उद्योगधंदे वाढावेत, स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कुंकू कारखानदार गोडसे आण्णा, संदेश गोडसे, गोरख खानट, धनंजय सोलापूरे, कृषी सहाय्यक प्रवीण दगडे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बिचितकर, प्रहार संघटना करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, बापू तळेकर, सागर दोंड, ग्रामपंचायत सदस्य गोरख पारखे, सागर कुरडे, उपसरपंच शरद वायबासे, रंधवे गुरुजी, महादेव लोंढे सर, पाटील सर यांच्यासह केम गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 5