करमाळा : रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथे ‘राखी फॉर नेशन’ हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. मागील वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदाही उत्साहामध्ये आयोजन करण्यात आले.*
सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी रावगाव गावातून देशभक्तीपूर्ण वातावरणात फेरी काढून गावातील महिला भगिनींकडून सीमेवरील जवानांसाठी राख्या संकलित केल्या. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अक्रूर शिंदे, सुभेदार कॅप्टन शंकर कोळेकर, सुभेदार बाबासाहेब बोलभट्ट, मेजर सुभाष वलटे, मेजर मारुती रासकर, मेजर अशोक शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रसिंह ठाकूर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.*
यावेळी बोलताना आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी मागील वर्षापासून हा उपक्रम राबवत असल्याबद्दल विद्यालयाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्रात ‘राखी फॉर नेशन’ सारखा उपक्रम दरवर्षी अशा व्यापक स्वरूपात राबविणारे पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव हे एकमेव विद्यालय असल्याचे सांगितले.*
विद्यालयाच्या विविध सामाजिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमांचे कौतुक करताना, यापुढील काळातही शाळेच्या विविध उपक्रमांसाठी आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य, मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी आपण सदैव उपलब्ध राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.*
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सीमेवर कार्यरत असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या शौर्याला अभिवादन केले.*
विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आणि ग्रामस्थांकडून संकलित केलेल्या राख्या रक्षाबंधन पूर्वी राजस्थानच्या सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचणार असून, ‘राखी फॉर नेशन’च्या माध्यमातून रावगावच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाला राष्ट्रप्रेमाची अर्थपूर्ण जोड देत एक अनुकरणीय उपक्रमाची परंपरा कायम ठेवली आहे.*






















