सोलापूर : शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित वसुंधरा कला महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त ‘पत्रकारितेची गुरुकिल्ली’ या विषयावरील व्याख्यान आणि काव्य संमेलन उत्साहात पार पडले. पत्रकार, कवी आणि गुरुजनांचा सत्कार करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख वक्ते महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांनी ‘पत्रकारितेची गुरुकिल्ली’ या विषयावर मार्गदर्शन केले. पत्रकारितेचा इतिहास, वाटचाल आणि बदलते स्वरूप यांचा आढावा घेत त्यांनी मार्शल लॉच्या काळात सोलापूरच्या पत्रकारांनी निर्भीडपणे बजावलेल्या भूमिकेचा गौरव केला. पत्रकारितेत सत्यता, अचूकता, नैतिकता आणि संविधाननिष्ठा ही मूल्ये जपणे आवश्यक असून, पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचा वसा आहे, असे त्यांनी सांगितले.
यानंतर झालेल्या काव्य संमेलनात मुबारक शेख, रेणुका बुधाराम, मारुती कटकधोंड, पत्रकार विजय गायकवाड, रामप्रभू माने , आशुतोष नाटकर आणि शाहीर रमेश खाडे यांनी काव्य रचना सादर करून रसिकांची दाद मिळविली. रेणुका बुधाराम यांच्या ‘कृपासिंधू’ कवितेतील ‘कधी नाही केली पंढरीची वारी, काम तेच हरी मानूनिया’ या ओळींमधून कर्मयोगाचा संदेश देण्यात आला. मुबारक शेख यांच्या ‘मेहंदी’ गझलेने रसिकांना मंत्रमुग्ध केले तर मारुती कटकधोंड यांच्या प्रेमकवितेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजय गायकवाड यांच्या ‘स्माईल’ कवितेतून आनंदाचा संदेश देण्यात आला. रामप्रभू माने यांनी ‘बाप’ कवितेतून वडिलांचे त्यागमय व्यक्तिमत्त्व उभे केले. शाहीर रमेश खाडे यांनी दमदार आवाजात सादर केलेल्या ‘ज्वारीची लावणी’ने महाराष्ट्राच्या सुगीचे वैभव उलगडले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी गुरु, पत्रकार आणि कवी यांची सर्जनशीलता समाज व राष्ट्रनिर्मितीसाठी महत्त्वाची आहे. वर्तमानपत्रे ज्ञानवृद्धीसोबतच सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. काव्यसादरीकरणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ. तानाजी देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सुहास उघडे यांनी सूत्रसंचालन व संयोजन केले. प्रा. रेश्मा सुर्वे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, पत्रकार, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 10