पंढरपूर – आषाढी यात्रेसाठी प्रशासनाकडून सध्या शहरात जोरदार तयारी सुरु करण्यात आलेली आहे. आषाढी यात्रेच्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्री येथे आल्यानंतर येथील पां.तु.उत्पात मार्गावरील एका मठाला मुख्यमंत्री भेट देणार आहेत. त्यामुळे या पां.तु.उत्पात पथाच्या काही भागा पर्यंतच सध्या प्रशासनाकडून डांबरीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सोईसाठी जरी या मार्गाच्या काही भागाचे डांबरीकरण केले गेले असले तरी वारकऱ्यांच्या सोईसाठी संपुर्ण पां.तु.उत्पात मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी त्या भागातील नागरिकांमधून केली जात आहे.
आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या वारकरी भाविकांची कोणतीही गैरसोय होता कामा नाही असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. यावर्षी सुमारे तीस लाख भाविकांची आषाढी यात्रेसाठी उपस्थित राहिल असा अंदाज दस्तुरखुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून वर्तविला गेलेला आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून सध्या २० ते २५ लाख भाविक येतील असा अंदाज बांधून यात्रेसाठीची तयारी केली जात आहे.
यात्रेच्या काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. आषाढी यात्रेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकादशीच्या दिवशी विठुरायाची शासकीय महापुजा संपन्न होत आहे. मुख्यमंत्री या दौऱ्यात येथील पां.तु.उत्पात मार्गावरील एका मठाला देखील भेट देणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भेट देणार असलेल्या या मठाच्या समोरील पां.तु.उत्पात रस्त्यावर काही भागापर्यंतचेच डांबरीकरणाचे काम प्रशासनाकडून सध्या हाती घेण्यात आलेल आहे.
मुळात विठ्ठल मंदिराच्या पश्चिमव्दार ते चौफाळा या रस्त्याला समांतर असा पां.तु.उत्पात पथ आहे. यात्रेच्या काळात या रस्त्यावर देखील वारकरी भाविकांची मोठी वर्दळ असते. गर्दी टाळत मंदिराकडे जाण्यासाठी सर्रास वारकऱ्यांकडून याच रस्त्याचा वापर केला जातो. मात्र सध्या या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री या रस्त्यावरील एका मठाला भेट देणार आहेत. त्यामुळे या मठाच्या समोरील बाजूच्या रस्त्याचे काम प्रशासनाकडून सध्या हाती घेण्यात आलेले आहे. अगदी मनलावून चार दिवसांमध्ये या रस्तयावर खडीटाकण्या पासून ते अगदी डांबरीकरणा पर्यंतचे काम पुर्ण केले गेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी जरी या रस्त्याचे डांबरीकरण केले जात असल्या बद्दल कुणाचाही आक्षेप नाही.
मात्र मठाच्या समोरील उर्वरित रस्त्यावरुन देखील यात्रेच्या काळात वारकऱ्यांची ये जा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी जसा अर्धा रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे तसाच वारकऱ्यांच्या सोईसाठी या संपुर्ण रस्त्याचेच डांबरीकरण केले जावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
Post Views: 10