सोलापूर – महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी २०१० सालचे महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील कुस्ती क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समाधान घोडके हे महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील एक दमदार, लोकप्रिय आणि अनुभवी नाव मानले जाते. आपल्या मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर त्यांनी राज्यभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारेल, असा विश्वास कुस्तीप्रेमी आणि पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
संघटनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुस्तीला चालना देणे, नवोदित पैलवानांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच पारंपरिक मल्लविद्येचे जतन आणि संवर्धन करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय, लवकरच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून संघटनेची मजबूत बांधणी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
“कुस्तीचा विकास, पैलवानांचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक मल्लविद्येचा गौरव” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र कुस्ती संघटना अधिक जोमाने कार्य करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी समाधान घोडके यांची निवड महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पदाधिकारी संग्राम कांबळे यांनी जाहीर केली. तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या निवडीला अनुमोदन दिले आहे.
Post Views: 5