सोलापूर – जुना विडी घरकुल, प्रगती चौक येथील श्री गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळ व विष्णू महेश प्रतिष्ठान, सोलापूर यांच्यावतीने गोविंदराज नगर येथे २०० महिला व ५० पुरुषांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करून विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली.
गोविंदराज नगर येथे हा सोहळा उत्साहात पार पडला. सकाळी ७.४५ वाजता अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात झाली. प्रत्येक आवर्तनानंतर ‘ॐ गं गणपतये नम:’चा १३ वेळा जप करण्यात आला. ९.२० वाजता ११ आवर्तने पूर्ण झाली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रथमेश कोठे, अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पं. वेणुगोपाल जिल्ला पंतुलू, नगरसेविका उज्ज्वला दासरी, अविनाश दासरी, अध्यक्ष जगपती मिठ्ठा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी सहभागी महिलांना विष्णू महेश प्रतिष्ठानच्यावतीने खण, अल्पोपहार देण्यात आले. महिला मंडळाच्या सदस्यांनी पारंपरिक इरकल साडी परिधान करून आराधना केली. पारंपरिक वेशभूषा आणि पुष्पहार, आभूषणांनी सजवलेली श्रींची मूर्ती लक्षवेधी ठरली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.






















