सोलापूर – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(एसडीएलटीए) यांच्या वतीने व अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या मान्यतेखाली, महाराष्ट्र शासन, सोलापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय पुरस्कृत एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ ३० हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा 11 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत एम एस एल टी ए टेनिस सेंटर, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी होणार आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, या पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत अव्वल टेनिसपटूनी आपला सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण एटीपी गुण व पारितोषिक रक्कम मिळवण्याची संधी मिळणार आहे. भारतीय टेनिसपटूंना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी व गुण प्राप्त करता यावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत करण सिंग, दिग्विजय प्रताप सिंग, सिद्धार्थ रावत, एसडी प्रज्वल देव, मनीष सुरेशकुमार, देव जाविआ हे मानांकित खेळाडू मुख्य ड्रॉ मध्ये झुंजणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.
एमएसएलटीएचे सह सचिव व स्पर्धा संचालक राजीव देसाई यांनी सांगितले की, अर्णव पापरकर, अनुप बंगार्गी यांना मुख्य ड्रॉसाठी, तर प्रज्वल तिवारी, वंश नांदल, मायंद तिवारी यांना पात्रता फेरीसाठी वाईल्ड कार्ड द्वारे प्रदान करण्यात आले आहे. स्पर्धेत भारत, अमेरिका, ट्युनिशिया, जपान, थायलंड, स्वित्झरलँड, कझाकस्तान, नेपाळ, स्वीडन या ९ देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व 50 एटीपी गुण, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व 30 एटीपी गुण देण्यात येणार आहेत. याशिवाय उपांत्यफेरीतील खेळाडूला 18गुण, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूला 9 गुण, उप-उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूस 5 गुण आणि पहिल्या फेरीतील खेळाडूस 1गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 11 ऑक्टोबर व 12 ऑक्टोबर रोजी होणार असून मुख्य ड्रॉच्या फेरीचे सामने 13 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. स्पर्धेसाठी इराणच्या नेदा काझेमी यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पुण्याच्या लीना नागेशकर यांची सहाय्यक सामना पर्यवेक्षक, राजीव देसाई हे स्पर्धा संचालक म्हणून काम पाहणार आहेत. या स्पर्धेसाठी पंच म्हणून रोहित बालगवी(कर्नाटक), शैलेश तांबे (मुंबई), सेल्वराज कोट्टेश्वरन (चेन्नई), रितुराज बसंत(आसाम), सैबल बॅनर्जी(कलकत्ता), करण सिंग(दिल्ली) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्पर्धेचा उदघाटन समारंभ 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
——
*स्पर्धेतील मुख्य ड्रॉमधील मानांकित खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:*
1. गॅरेट जॉन्स(अमेरिका, 442), 2. करण सिंग(भारत, 483), 3. अझीझ ओउका(ट्युनिशिया, 531), 4. दिग्विजय प्रताप सिंग(भारत, 551), 5. सिद्धार्थ रावत (भारत, 654), 6. एस डी प्रज्वल देव(भारत, 659), 7. रियुकी मात्सुदा(जपान, 679), 8. मनीष सुरेशकुमार(भारत, 701).
Post Views: 18