सोलापूर – मराठी भाषेचा अभिजात वारसा केवळ साहित्यापुरता मर्यादित नसून तो लोकसंस्कृती, लोककला, परंपरा आणि दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेला आहे. या भाषेचा अभिमान जागवतानाच तिच्याशी निगडित सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश जिल्हा परिषद सोलापूर आणि पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उत्सव अभिजात मराठीचा’ या कार्यक्रमातून देण्यात आला.
कविता, अभंग, भारूड, पोवाडे, वासुदेवाची गाणी, जात्यावरची गाणी आणि हलगीवादनाच्या सादरीकरणातून मराठी संस्कृतीचा जिवंत वारसा अनुभवायला मिळाला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सूर्यकांत भुजबळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल मुळे यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषद मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त शुक्रवारी (दि. ९) आयोजित हा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून पार पडला. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पांढऱ्या टोप्या परिधान करून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेप्रती आदर व्यक्त केला. परंपरागत सांस्कृतिक प्रतीकांच्या माध्यमातून मराठी भाषेचे वैभव आणि अस्मिता जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
मराठी भाषा ही भावना, विचार आणि संस्कृती प्रभावीपणे व्यक्त करणारी भाषा आहे. तिचे महत्त्व केवळ बोलणे आणि लिहिण्यापुरते नसून, भाषेशी जोडलेल्या लोकपरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यातही आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले. मराठीतील एकाच शब्दाचा वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलणारा अर्थ आणि त्याचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा जपण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकाने स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. हलगीवादनातील वीररस, महाराष्ट्राच्या लोकजीवनातील पांढऱ्या टोपीचे महत्त्व आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित परंपरा यांवरही त्यांनी प्रकाश टाकला. भाषेचा अभिमान बाळगण्याबरोबरच तिच्या सांस्कृतिक प्रतीकांचे जतन करणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाची प्रस्तावना गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार यांनी केली. सहायक गटविकास अधिकारी सनी चव्हाण यांनी मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणि तिच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. मेहताब शेख, अपर्णा तुळजापुरकर आणि ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. मराठी भाषेचा अभिमान जागविण्यासोबतच तिच्या लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याची प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला.
चौकट
कविता, अभंग आणि हलगीवादनाने रंगत
कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, सहशिक्षक रंगनाथ कोरे, ज्योती वाघमारे, अपर्णा तुळजापुरकर, प्रमोद कस्तुरे, दीपाली बोराळे, अंजली जमखंडीकर आणि मंजुषा कलशेट्टी यांनी कविता वाचन केले. दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शरीफ सय्यद यांनी ‘बाप’ ही स्वलिखित कविता सादर केली, तर पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक अभिमन्यू कांबळे यांनी ‘दोन दिवस’ ही कविता गायली.
चौकट
‘नटसम्राट’मधील प्रसंगातून भावपूर्ण श्रद्धांजली
कार्यक्रमादरम्यान दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विवेक कुलकर्णी यांनी ‘नटसम्राट’ नाटकातील एका प्रसंगाचे प्रभावी सादरीकरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
Post Views: 13