बार्शी – येथील मुस्लिम बिरादार जमात संस्थेच्यावतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा रविवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडला. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल होते, तर उद्घाटक म्हणून आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमास तहसीलदार एफ. आर. शेख, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, नासिरभाई मुलाणी, डॉ. संदीप तांबारे, प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष हाजी ज. इकबालभाई पटेल यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर संघटक वाहिदपाशा शेख यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी समाजातील १०८ गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या अधिकारी, डॉक्टर आणि वकील यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्या –आमदार सोपल
मार्गदर्शन करताना आमदार दिलीप सोपल यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यावा व समाजातील प्रत्येक मुलगा-मुलगी मुख्य प्रवाहात यावी यासाठी पालकांनीही जागरुक राहण्याची गरज असल्याचे सांगितले. शिक्षण हाच समाजाच्या प्रगतीचा खरा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.
तहसीलदार एफ. आर. शेख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या जगात प्रचंड स्पर्धा असून या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करुन आपले ध्येय निश्चित करावे आणि त्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. संदीप तांबारे यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासाचा उल्लेख करत, अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी देशाचे राष्ट्रपतीपद गाठले आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळख निर्माण केली, असे सांगितले. कठोर परिश्रम आणि शिक्षणाच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मुस्लिम समाजाच्या विकासासाठी सहकार्य -आ. राऊत
आमदार राजेंद्र राऊत यांनी मुस्लिम समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी आपण कायम सकारात्मक भूमिका घेऊ, असे त्यांनी सांगितले.
वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर अधिक भर द्यावा, असे सांगताना मुलींची शैक्षणिक प्रगती मुलांच्या तुलनेत अधिक असल्याचे नमूद केले. अनेक मुले मोबाईल, रील्स आणि विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी पालकांनी मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन केले. गुटखा, तंबाखू आणि इतर व्यसनांपासून मुलांना दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सोपल आणि आमदार राऊत एकाच व्यासपीठावर
मुस्लिम बिरादार जमात संस्थेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे बार्शी तालुक्याचे आमदार दिलीप सोपल आणि सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणे होय. दोन्ही लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. दोन्ही नेत्यांची एकत्र उपस्थिती कार्यक्रमात उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली.
संस्थेचे अध्यक्ष हाजी ज. इकबालभाई पटेल यांनी समाजासाठी स्वतंत्र हॉल, हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी सहकार्याची मागणी केली. यावर आमदार दिलीप सोपल, आमदार राजेंद्र राऊत आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. यशवंतराव चव्हाण सभागृहाचा खालचा व वरचा मजला पूर्णपणे भरुन गेला होता. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला भव्य स्वरुप प्राप्त झाले. आभार अख्तर शेख यांनी मानले
पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान
इकबालभाई पटेल, सचिव जाकीरहुसेन शेख, खजिनदार वसिमभाई पठाण, सहसचिव अख्तर शेख, संघटक वाहिदपाशा शेख, कायदेशीर सल्लागार ॲड. सर्फराज मुजावर, उपाध्यक्ष रफिकभाई सातारकर, सलीम ख्वाजाभाई शेख, सादिकभाई मुल्ला, इब्राहीमभाई काझी यांच्यासह उस्मानअली शाह, इस्माईलभाई पटेल, इरफानभाई शेख, शाहनवाजभाई मुल्ला, समशेरभाई (रॉनी) सय्यद, अयाज आयुब शेख, जमीरभाई शेख, एजाजभाई शेख, सादिकभाई काझी, शकीलभाई मुलाणी, रियाजभाई पठाण (पत्रकार), मुसाभाई मुलाणी, साजनभाई शेख, इम्रानभाई झारेकरी, जफरभाई शेख, अकिबभाई पठाण, शाकीरभाई शेख, अब्बासभाई शेख, शकीलभाई झारेकरी आदींनी परिश्रम घेतले.
Post Views: 12