धाराशिव – धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पावसाअभावी शेतातील उभे सोयाबीन पीक सुकून करपण्यास सुरुवात झाली असून, हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी रविवारी रत्नापूर, चोराखळी, येरमाळा, हावरगाव, मस्सा तेरखेडा परिसरातील शेतांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली.
यावेळी आमदार पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती, पिकांचे नुकसान, उत्पादनातील संभाव्य घट तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान अनेक शेतांमधील सोयाबीन पीक पाण्याअभावी सुकून करपल्याचे दिसून आले. मशागत, बियाणे, खते व औषधांवर मोठा खर्च करूनही पाऊस न झाल्याने संपूर्ण हंगाम हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी आमदार पवार यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडत शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली. पावसाअभावी पिकांची झालेली अवस्था पाहताना शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीही गंभीर होत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.
तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, “डोळ्यादेखत शेतकऱ्यांचे सोयाबीन जळत आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. रत्नापूर परिसरातील सोयाबीनसह इतर खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, “गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या पीकविम्याची रक्कम अद्याप मिळालेली नसलेल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे तातडीने मिळावेत. येत्या पाच दिवसांत चारा छावण्या सुरू कराव्यात. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन त्यांनाही शासनाने मदत करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
कागदोपत्री आढावा नको; प्रत्यक्ष पंचनामे करा
शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पावसाअभावी पिकांची दयनीय अवस्था स्पष्टपणे दिसून येत असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. “केवळ कागदोपत्री आढावा घेऊन चालणार नाही. शासनाने अधिकारी व संबंधित यंत्रणांना प्रत्यक्ष शेतात पाठवून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पावसाने आणखी ओढ दिल्यास कळंब तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, अविनाश जाधवर, गोविंद मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
























