मोहोळ – सहकार तपस्वी ब्रह्मदेवदादा माने शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “आचार्य दादासाहेब दोंदे पुरस्कार” वितरण सोहळ्यात पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचोलीकाटी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील मुख्याध्यापक मा. श्री. ह. न. पाटील यांना “आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा रविवार दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी किल्लेदार मंगल कार्यालय, आसरा चौक, जुळे सोलापूर येथे माजी आमदार श्री दिलीपराव माने, जिल्हा परिषद सदस्य श्री पृथ्वीराज माने, पोलीस उपनिरीक्षक श्री शैलेश खेडेकर, संस्थापक श्री म ज मोरे सर, संस्थेचे अध्यक्ष श्री फिरोज शेख सर व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
श्री. ह. न. पाटील यांनी पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचोलीकाटी येथे कार्यरत असून विविध शैक्षणिक व प्रशासकीय आव्हानांना समर्थपणे तोंड देत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेत सायन्स लॅब, आयडियल लॅब, विविध शैक्षणिक उपक्रम, क्षेत्रभेटी, कला व क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे राबविण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता व स्पर्धात्मकता विकसित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
शाळेची गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला चालना देणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शाळेची वेगळी ओळख निर्माण करणे या कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल श्री. ह. न. पाटील यांच्यावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या गौरवामुळे पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचोलीकाटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
























