सोलापूर : मुलीला फोनवर बोलण्यास आणि भेटण्यास विरोध करणाऱ्या मुलीच्या आईला घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहीन शेख, रुक्सार, सोनाली (सर्व रा. ठोकळ नगर, बाळे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे असून याबाबत अनिता शिवानंद हिरेमठ (वय ४०, रा. कळके वस्ती,) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अनिता हिरेमठ यांच्या घरासमोर काम करणारा सोहेल शेख हा त्यांच्या मुलीशी वारंवार फोनवर बोलत होता. यामुळे फिर्यादी अनिता हिरेमठ व त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या मुलीला सोहेलशी न बोलण्याचा आणि न भेटण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरी नातेवाईक आलेले होते. त्यावेळी सोहेल शेखची आई आरोपी शाहीन शेख आणि त्याच्या दोन बहिणी रुक्सार व सोनाली या तिघी जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात घुसल्या. “तुम्ही तुमच्या मुलीला सोहेलशी बोलण्यास का विरोध करता?” असे म्हणत त्यांनी अनिता हिरेमठ यांच्याशी वाद घातला. अनिता आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, तिन्ही महिलांनी त्यांना अर्वाच शिवीगाळ केली. तसेच आलेल्या पाहूण्यांना आणि फिर्यादीना आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार बावणे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 11