बार्शी – कृष्णेचे पाणी भीमेच्या खोरेत आणण्याच्या १७ हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अडथळे दूर करुन मंजूरी दिली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे. या योजनेमुळे सोलापूर जिल्हयाला व मराठवाड्याला अतिरिक्त पाणी मिळणार असून त्यातील पाणी सोलापूर जिल्हयातील पाणीवाटपात कमी असलेल्या बार्शी तालुक्याला देण्याबाबत आपण सकारात्मक आहोत. बार्शी तालुक्यासाठी आपण ५ टीएमसी पाण्याची शिफारस केली आहे. आमदार महोदय चिकाटीने ते मंजूर करुन घेतील असा विश्वास व्यक्त करत त्याचबरोबर बार्शी नगरपालिकेने बार्शी उपसा सिंचन टप्पा २ येथून पिण्याचे पाणी बार्शीला नेण्याबाबत दिलेल्या प्रस्तावालाही मान्यता देवून बार्शीसाठी पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था करु, अशी ग्वाही कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांनी दिली.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, जि.प.अध्यक्ष दीपक वैद्य, बाजार समितीचे सभापती विजय गरड आदी उपस्थित होते.
धुमाळ म्हणाले, आमदार राऊत यांनी बार्शी उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित कामाबाबत चिकाटीने पाठपुरावा केला. आ.राऊत हे मुख्यमंत्री व मंत्रीमहोदयांकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याने या योजनेला निधी निर्माण होणे, टेंडर निघून वर्कऑर्डर व प्रत्यक्ष काम अशी गती येवून या कामाला यश आले असे म्हणता येईल. गेली २० वर्ष प्रलंबित असलेली ही योजना ८० टक्के पूर्ण केली आहे. तावडी तलावात पाणी सोडण्यास निधी व सुप्रमाची अडचण होती. मार्चपासून आम्ही झगडत होतो. त्यातील अडचण आता दूर झाली आहे. संबंधित ठेकेदारांना पुढील आठवड्यात निधी देत असल्याचे सांगून काम पूर्ण करण्याचे सांगितले आहे. या योजनेच्या टप्पा ३ ज्यामध्ये पिंपळगांव ढाळे धरणात पाणी टाकायचे आहे. यातील अडचण दूर करण्यासाठी मंत्रीमहोदयांची वेळ घेतली जाईल. तोपर्यंत नियोजन करुन सर्वेक्षणाचे काम घ्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, सध्या बार्शीची पिण्याची पाण्याची अडचण असल्याने ज्यावेळी बार्शी उपसा सिंचनचे पाणी सोडले जाईल, त्यावेळी लक्ष्याचीवाडी येथील टप्पा २ येथून न.पा.ला प्रतिदिन ९० लाख लिटर्स पाणी दोन वर्षाकरिता मिळावे. तसेच कृष्णेचे पाणी आणण्याची मुख्यमंत्री महोदयांची जी महत्वाकांक्षी योजना आहे, यात सोलापूर जिल्हयाला ४० ते ५० टीएमसी व मराठवाड्याला १५ टीएमसी पाणी मिळणार आहे. सोलापूर जिल्हयातील पाणी वाटपात पूर्वी बार्शी तालुक्याला कमी पाणी मिळाले आहे. त्यामुळे पाणीवाटपची बैठक घेवून पूर्वीच्या वाटपात कमी पाणी मिळालेल्या बार्शीला आता या योजनेतून किमान ५ टीएमसी पाणी दयावे व आमच्या अवर्षणग्रस्त दुष्काळी भागाला न्याय दयावा, अशी भावना व्यक्त केली. यावेळी आ. राऊत यांनी कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. तत्पूर्वी, धुमाळ यांनी उपसा सिंचनच्या कामांची पाहणी केली.
Post Views: 11