सोलापूर : सोलापूर शहरातील मिळकतदारांना आता त्यांच्या मालमत्तांची ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यानुसार मिळकतदारांनी आपल्या मिळकतीची ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.
यासंदर्भात महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागामार्फत मिळकत अभिलेख (प्रॉपर्टी रेकॉर्ड) अद्ययावत व अचूक ठेवण्यासाठी शहरातील सर्व मिळकतधारकांच्या मिळकतीची ई-केवायसी करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेअंतर्गत मिळकतधारकांची ओळख, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांकाशी संलग्न माहिती, मालकी हक्काची अद्ययावत माहिती इत्यादी तपशील पडताळून मिळकत अभिलेख अद्ययावत करण्यात येणार आहेत. यामुळे मिळकतकराशी संबंधित सेवा अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.
शहरातील सर्व मिळकतधारकांनी महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या आपल्या संबंधित पेठेचे कर निरिक्षक / वसुली लिपिक कर्मचाऱ्यांकडे आवश्यक माहिती देऊन आपल्या मिळकतीची ई-केवायसी तात्काळ करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने यांनी केले आहे.
ई-केवायसीसाठी मिळकत कर बिलाची प्रत/मिळकत क्रमांक, आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.
मिळकत अभिलेख अद्ययावत करण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सर्व नागरिकांनी सहकार्य करून आपल्या मिळकतीची ई-केवायसी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त, डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
Post Views: 6