पंढरपूर – येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका बालकाच्या हातावर चुकीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे पालकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
येथील सुनील दंडाडे यांच्या मुलाच्या उजव्या हातावरील खराब झालेल्या करंगळीची शस्त्रक्रिया करण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. मात्र डॉ.काणे यांनी उजव्या हातावी करंगळी काढण्या ऐवजी संबंधित मुलाच्या डाव्या हाताची करंगळी काढली. डॉ.काणे यांनी निष्काळजीपणा करून चुकीची शत्रक्रिया केली. यामुळे पालकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेची गंभीर दखल वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली असून डॉ.काणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर डॉ.काणे यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
अगोदरच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सोयी सुविधा मिळत नराल्यामुळे रुग्णातून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच आता चुकीच्या शस्त्रक्रिया होऊ लागल्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे.
——————
या प्रकरणी चौकशी समिती गठीत
या प्रकरणाची दखल उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार सरडे यांनी घेतली असून शस्त्रक्रिया प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन डॉक्टरांची समिती गठीत करण्यात आली आहे.
——————
संबंधित सहा वर्षाच्या लहान मुलाच्या उजव्या आणि डाव्या अशी दोन्ही हाताला सहा बोटे आहेत. दोन्ही हातावर शस्त्रक्रिया करावयाची होती. मात्र दोन्ही हातावर ती एकदम न करता थोड्या दिवसाच्या अंतराने करावयाची होती. सुरुवातील डाव्या हाताची करंगळी काढली आणि त्या नंतर संबंधित मुलाच्या उजव्या हाताची करंगळी काढण्यात येणार आहे. या मध्ये कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही. संबंधित मुलाच्या वडिलांनी देखील आम्हाला लेखी पत्र देवून या संदर्भात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले आहे.
















