धाराशिव : दुष्काळामुळे शेतशिवारात निर्माण झालेल्या दाहक परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली. करजखेडा दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी व पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतल्यानंतर येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबत शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याचे नियोजन तसेच अन्य दुष्काळी उपाययोजना राबविण्याबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्यासह आवश्यक उपाययोजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यामुळे शासनाच्या आगामी निर्णयाकडे धाराशिवसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सरसकट मदतीचे संकेत
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून, दुष्काळाचा शासन निर्णय पुढील दोन दिवसांत काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रसंगी पालकमंत्री प्रताप सरनाईक, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जि.प.अध्यक्ष अर्चनाताई पाटील आदी उपस्थित होते.
Post Views: 9