सोलापूर : विडी घरकुल, महेश-विष्णू चौक परिसरातील गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजा गणपतीची प्रतिकृती साकारून श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या गणेशोत्सवात दररोज गणरायाला विशेष मोदकाचा नैवेद्य दाखवून त्याचा लिलाव केला जात असून, यंदाच्या मोदक लिलावाला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंतची बोली ५५१ रुपयांपासून २ हजार १२१ रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र, यावेळी लिलावात रंगत वाढत गेली आणि नगरसेवक अजय पोन्नम यांनी तब्बल ७ हजार रुपयांची विक्रमी बोली लावत गणरायाच्या हातातील मोदकाचा प्रसाद घेतला.
गणरायाच्या चरणी अर्पण झालेला मोदक प्रसादरूपाने मिळविण्यासाठी झालेल्या या लिलावात भक्तिभावासोबतच उत्साहाचीही चुरस पाहायला मिळाली. अजय पोन्नम यांनी विक्रमी बोली लावत प्रसाद घेतल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष जगपती मिठ्ठा यांनी त्यांचा सत्कार केला.
दररोजच्या नैवेद्याचा लिलाव करून तो प्रसाद भाविकांना देण्याच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाला भक्तीची आगळीवेगळी जोड मिळाली आहे. ‘बाप्पाच्या हातातील मोदक आपल्याला मिळावा’ या भावनेतून भाविक लिलावात सहभागी होतात, प्रत्येक दिवशी बोली वाढत असल्याने मंडळ परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.






















