बार्शी – कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, पीकविमा रद्द केलेले ट्रिगर पुन्हा लागू करावे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. सरकारने या जाचक अटी रद्द कराव्यात व शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थाने कोरा करावा ही मागणी यावेळी करण्यात आली.
सन २०१९ मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली त्यातील जे शेतकरी यावेळी पुन्हा कर्जमाफीसाठी पात्र झाले त्यांना या कर्जमाफीत केवळ ५० हजार रुपये देण्यात येणार असून त्यातही त्यांना त्यांच्यावर असलेले उर्वरित कर्ज संपूर्णपणाने फेडण्याची अट टाकण्यात आली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले असून ज्यानी चार वेळा नजीकच्या काळात कर्ज भरले असल्याची अट टाकत केवळ ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानावर त्यांना बोळवन घालण्यात आले आहे. इतरही अनेक जाचक अटी कर्जमाफीसाठी लावण्यात आल्या आहेत.
राज्य सरकार ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात या अटी शर्तीमुळे खूप कमी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीचा लाभ होणार आहे.
२०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने सबंध महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची भरपाईही योग्यरित्या शेतकऱ्यांना देण्यात आली नव्हती. आता अशाप्रकारे अटी शर्ती लावल्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचाही पुरेसा लाभ मिळणार नाही. सरकारने या पार्श्वभूमीवर आपण लावलेल्या अटी शर्तीचा पुनर्विचार करावा. या अटी शर्ती काढून टाकाव्यात.
पीक कर्जाबरोबरच शेती अवजारांसाठी घेतलेले कर्ज, सिंचन सुविधांसाठी घेतलेले कर्ज, कुक्कुटपालन, इमूपालन, पॉलिहाऊस शेतकऱ्यांचे कर्ज इत्यादी शेती कर्जांचा समावेशही कर्जमाफीच्या योजनेत करावा. सोनेतारण व मायक्रोफायनान्स कर्जही माफ करावे अशा मागण्या यावेळी युवासेना ठाकरे गट बार्शी यांच्यावतीने करण्यात आल्या आहेत. तसेच पिक विम्याचे वगळलेले ट्रिगर पुन्हा लागू करा, याबाबतचे मागण्यांचे निवेदन देण्यात आले मागण्यावर दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख स्वराज क्षीरसागर, युवासेना जिल्हा सचिव दिपक तिवाडी, युवासेना शहर सहसचिव अर्जुन सोनवणे, युवासेना समन्वयक पांडुरंग घोलप, युवासैनिक दिपक चुंगे, अभिषेक मडके, आनंद उकरंडे, राहुल बुरसे, महेंद्र गरड यांच्या सह युवासैनिक उपस्थित होते.