सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महापुरुषांच्या जयंती यादीत टिपू सुलतानचे नाव नसतानाही जयंतीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे आयोजकांना पोलिसांनी जयंती साजरी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी सकल हिंदू समाज, मंद्रूप यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मंद्रूप पोलिसांना निवेदन देण्यात आले असून, प्रशासनाने परवानगी दिल्यास
राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सकल हिंदू समाज, मंद्रूपच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टिपू सुलतान हा क्रूर व कट्टर शासक होता, ज्याने अनेक मंदिरांचा विध्वंस केला व अत्याचार केले. ऐतिहासिक दृष्ट्या वादग्रस्त असलेल्या व्यक्तीचे उदात्तीकरण आणि जयंती साजरी करणे हे सामाजिक सलोख्याला बाधा आणणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या थोर महापुरुषांच्या नावाचा वापर करून किंवा त्यांच्या आडून अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शासनाच्या अधिकृत यादीत टिपू सुलतानच्या जयंतीचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे टिपू सुलतान जयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.



















