पुणे – महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली राज्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे येथे २४ जुलैपासून शांततापूर्ण बेमुदत आमरण उपोषण सुरू झाले आहे. राज्यभरातील बी.पी.एड., एम.पी.एड. व TAIT-2025 पात्र शारीरिक शिक्षण शिक्षकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे.
शालेय शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सक्षम समाज, बलशाली राष्ट्रनिर्मिती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यात या विषयाची भूमिका महत्त्वाची असतानाही, गेल्या सुमारे २० वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, हजारो पात्र तरुण बेरोजगार आहेत.
यापूर्वी महासंघाच्या वतीने २७ एप्रिल आणि ८ जुलै २०२६ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलने करण्यात आली होती. त्या वेळी शासनाकडून विशेष शिक्षक (क्रीडा) पदांच्या सेवा शर्ती जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर शिक्षकांना आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा महासंघाने दिला आहे. आंदोलनाला महासंघाचे मार्गदर्शक प्रद्युम्न जोशी, कैलास माने, विश्वनाथ पाटोळे, अमोल जोशी, राज्याध्यक्ष संदीप मनोरे, राज्य सचिव तायाप्पा शेंडगे, तसेच राज्य कोअर कमिटी सदस्य व विविध पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले असून राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.
उपोषणात सहभागी प्रमुख शिष्टमंडळ
सध्या सुरू असलेल्या आमरण उपोषणात सहभागी पदाधिकारी : नागेश पाटील (पंढरपूर), सुमित बंडलकर (सातारा), शुभम ताठे (अहिल्यानगर), प्राजक्ता जोशी (छत्रपती संभाजीनगर).
प्रमुख मागण्या
* विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा शर्ती तात्काळ प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करावी.
*शासन निर्णय दि. ०२ जानेवारी २०२६ नुसार मंजूर ४,८६० विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची १०० टक्के भरती पवित्र पोर्टल (TAIT-2025) च्या पहिल्या टप्प्यात करावी.
* शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ नुसार रिक्त होणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत.
* जिल्हा परिषद केंद्रशाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय आश्रमशाळा व समाजकल्याण विभागाच्या शाळांमधील सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत.
* पवित्र पोर्टल (TAIT-2025) ची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.





















