सोलापूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले असून वारकरी परंपरेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या दिंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सहभागी होत टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम” चा जयघोष केला. विद्यार्थ्यांनी वारकरी नृत्य, समाजप्रबोधनपर संदेश, कीर्तन, अभंग व भक्तिगीते यांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
दिंडी गावातील प्रमुख मार्गांवरून फिरली. अंत्रोळी गावातील प्रत्येक घरासमोर ग्रामस्थांनी सडा-रांगोळी काढून दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. अनेक ठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले. संपूर्ण गावात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील नागरिकांनी दिंडीत मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने गावात जणू भक्तीचा अथांग सागर लोटला होता.
कार्यक्रमादरम्यान श्रीरंग बनसोडे सर यांनी विठ्ठलभक्तीपर गीते सादर करून वातावरण भक्तिमय केले. नागनाथ म्हमाणे सर यांनी सादर केलेल्या वारकरी नृत्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. तसेच शाळेतील किर्ती जाधव मॅडम, बनसोडे मॅडम आणि राठोड मॅडम यांनी वारकरी नृत्य व पारंपरिक फुगडीचे आकर्षक सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड सर, श्रीरंग बनसोडे सर, नागनाथ म्हमाणे सर, किर्ती जाधव मॅडम, बनसोडे मॅडम आणि राठोड मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या दिंडी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भक्ती, सामाजिक ऐक्य आणि संस्कार यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. उपस्थित ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळीच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत अशा सांस्कृतिक व संस्कारक्षम उपक्रमांचे आयोजन भविष्यातही व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Post Views: 21