सोलापूर : शहरातील बुधवार पेठ व परिसरात वाढलेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेने तातडीने कचरा उचलण्याचे योग्य नियोजन करावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.
आयुर्वेद कॉलेज रोड, बुधवार पेठ परिसरात महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या मक्तेदाराच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः आयुर्वेद कॉलेज रोडवरील उकिरड्यात अनेक दिवसांपासून मृत कुत्रा पडून असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. आयुर्वेद कॉलेज रोड, जय मल्हार चौक, मातंग वस्ती, मिलिंद नगर, सम्राट चौक आदी भागांत कचरा वेळेवर उचलला जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन नियमित कचरा संकलनाचे प्रभावी नियोजन करावे, संबंधित मक्तेदारावर कारवाई करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आनंद चंदनशिवे यांनी केली आहे. अन्यथा जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
Post Views: 12