बार्शी – शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवार पेठ परिसरात धडक कारवाई करत संशयित गोमांसाचा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. २६ जुलै रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजता बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवार पेठेतील रियाज गुलाम मुस्ताफा सौदागर (वय ५८) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सहाय्यक पोलीस फौजदार अजित वरपे, गोपनीय मदतनीस पो.कॉ. कादर तांबोळी यांच्यासह साठे, सुरवसे व नितनात यांनी सहभाग घेतला.
छाप्यात पत्र्याच्या शेडमध्ये जनावराच्या शरीराचे तुकडे टांगलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच चार पाय, मुंडके व इतर अवयव वेगळे केलेले असल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तीने ते गोमांस असल्याचे सांगितल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे. मात्र, संबंधित जनावराचे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र त्याच्याकडे आढळले नाही.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर व दुसरा दिवस द्वादशी असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संशयित मांस तातडीने जप्त करुन पोलीस ठाण्यात आणले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मांस व हाडांचे नमुने रासायनिक परीक्षणासाठी सीलबंद करुन जप्त करण्यात आले असून, उर्वरित नाशवंत मांसाची न्यायालयाच्या परवानगीनंतर नियमानुसार विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत अंदाजे १५० किलो संशयित गोवंशीय मांस, जनावराचे अवयव तसेच तीन लोखंडी सत्तुर असा एकूण ३०,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस कॉ. कादर सायबा तांबोळी यांनी फिर्याद दिली असून, रियाज गुलाम मुस्ताफा सौदागर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ मधील कलम ५(क), ५(ड) व ९ अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.