सोलापूर – नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश क स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी २०२३ या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोलापूरचे सुपुत्र प्रथमेश रमेश शिंदे यांनी या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.
सन २०१७ मध्ये प्रथमेश यांनी कायद्याची पदवी संपादन केली त्यावेळी त्यांनी सोलापूर विद्यापीठामधून सुवर्णपदक पटकावलेले होते व त्यानंतर त्यांनी एल. एल. एम. ही पदव्युत्तर पदवी संपादन करताना पहिल्याच प्रयत्नात विधी या विषयातून सेट देखील पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी समाजकार्य या विषयातून देखील पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. वकिली व्यवसायाबरोबर प्राध्यापक म्हणून दयानंद विधी महाविद्यालय, सोलापूर येथे काम करीत कायद्याचे ज्ञानदान देखील केलेले आहे.
” वकिली व्यवसाय करताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा मिळत गेली व त्यातूनच आपणही न्यायाधीश व्हाव हे स्वप्न उराशी बाळगून परीक्षेची तयारी केली. मी तिसऱ्या वेळा या परीक्षेत मुलाखती करिता पात्र झालेलो होतो, यापूर्वी एक वेळ मी वेटिंग यादी मध्ये देखील होतो न खचता मी माझा अभ्यास सुरू ठेवला तसेच निकालाच्या यादीत आपले नाव पाहणे हा आनंदाचा क्षण आहे, पण राज्यात दुसरा येणे हा धक्कादायक सुखद अनुभव आहे.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या यशाचे श्रेय प्रथमेश यांनी आई-वडील, बहीण-भाऊ तसेच पत्नी सौ. मोनली आणि मार्गदर्शक श्री. गणेश पवार सर व अॅड. गणेश शिरसाट सर यांना दिले आहे.


























