सोलापूर – जिल्हा परिषद शाळांच्या इमारती आणि मैदानांचा कोणत्याही खाजगी कार्यक्रमासाठी अथवा संस्थेसाठी परवानगीशिवाय वापर करता येणार नाही, असे स्पष्ट परिपत्रक नुकतेच प्राथमिक शिक्षण विभागाने जारी केले असतानाच पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खाजगी शिक्षण संस्थेने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जिल्हा परिषद शाळेच्या तीन वर्गखोल्यांमध्ये आपले वर्ग सुरू केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अलीकडेच जारी केलेल्या परिपत्रकात जिल्हा परिषद शाळांच्या इमारती, वर्गखोल्या आणि मैदानांचा विनापरवानगी वापर करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी एका जिल्हा परिषद शाळेत झालेल्या राजकीय कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक काढण्यात आले होते. त्यामुळे शाळांची मालमत्ता केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच वापरली जावी, असा प्रशासनाचा हेतू होता.
मात्र, याच परिपत्रकानंतर पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील जिल्हा परिषद शाळेत एका खाजगी शिक्षण संस्थेने तीन वर्गखोल्यांमध्ये आपले वर्ग सुरू केल्याची बाब पुढे आली आहे. संबंधित संस्थेने या खोल्यांचा ताबा घेताना जिल्हा परिषद अथवा प्राथमिक शिक्षण विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी घेतल्याचे नोंदीत दिसून येत नसल्याची चर्चा आहे.
नियमांनुसार जिल्हा परिषद शाळेची इमारत किंवा खोल्या कोणत्याही खासगी संस्थेला उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक असते. विशेष म्हणजे, यापूर्वीच जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने शाळांच्या इमारती कोणालाही भाड्याने किंवा इतर वापरासाठी देऊ नयेत, असा ठराव मंजूर केलेला आहे. त्यामुळे तारापूर येथील शाळेत हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती का, तसेच अतिक्रमणाबाबत कोणती नोंद करण्यात आली होती का, याचीही चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच स्थानिक पातळीवर राजकीय दबावामुळे कारवाई रखडल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कोट
चौकशीअंती कारवाई
यासंबंधी जिल्हा परिषदेकडे कोणतेही अहवाल किंवा तक्रार प्राप्त झालेली नाही. सदरची इमारत जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे का. किंवा व्यक्ती व संस्थेने दान दिलेली आहे याबाबत माहिती घेऊ. त्याच पद्धतीने यासंबंधी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झाला आहे का? याची देखील माहिती घेऊन संबंधित गटशिक्षणाधिकारी मार्फत चौकशी करून त्यावर कारवाई करण्यात येईल.
– कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि प सोलापूर
चौकट
अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शैक्षणिक इमारतीचा विनापरवानगी वापर झाल्याचा आरोप गंभीर स्वरूपाचा असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन काय भूमिका घेतात, संबंधित अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले जातात का आणि जबाबदारांवर कारवाई होते का, याकडे शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.