सोलापूर : संपूर्ण जगाला शांती, समता आणि मानवतेचा संदेश देणारे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या वतीने बुधवारी दोिनांक २६ ऑगस्ट रोजी शहरात जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस काढण्यात येणार आहे. विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टी अध्यक्ष हाजी एम.डी. शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जुलूसला सकाळी ८.३० वाजता विजापूर वेशीतून सुरुवात होईल. बेगम पेठ पोलीस चौकी, किडवाई चौक, सोशल हायस्कूल, मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशाह मदार चौक, जेलरोड, भारतीय चौक, बाराईमाम चौक, समाचार चौक, कोंतम चौक, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती, दत्त चौक, शालीमार टॉकीज, लक्ष्मी मार्केटमार्गे जुलूस पुन्हा विजापूर वेशीत येऊन दुपारी १.३० वाजता समारोप होईल. मक्का-मदिना येथील पवित्र स्थळांच्या आकर्षक प्रतिकृती, फुलांची सजावट, शंभरहून अधिक रिक्षा, ट्रॉली, बग्गी व अन्य वाहनांचा सहभाग हे जुलूसचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. मदरशांतील विद्यार्थी नाअत सादर करणार असून, उंट व घोड्यांवर स्वार मुले इस्लामी निशाण फडकावणार आहेत.
जुलूसपूर्वी रक्तदान शिबिर, खाऊ व फळे वाटप, चादर वाटप, हिजामा कॅम्प तसेच स्वच्छता अभियान घेण्यात येणार आहे. २६ ऑगस्टला सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मुंबईचे कव्वाल अदनान अजीम नाझा यांचा कव्वाली कार्यक्रम होणार आहे. मोहल्ला सजावट व थर्माकोल डेकोरेशन स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला हाजी मकबूल मोहोळकर, उत्सव अध्यक्ष कमरुल शेख, बब्बू अड्डेवाले, मोहसीन मैंदर्गीकर, असलम मुजावर, इरफान शेख, अजमल शेख, दुर्वेश शेख आदी उपस्थित होते.
——
Post Views: 46