सोलापूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) सोलापूर सेंटर आणि भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ट यांच्या वतीने नेहरू नगर येथील शासकीय मैदानात वृक्षारोपण, सिडबॉल वाटप, प्लास्टिकमुक्ती जनजागृती आणि कापडी पिशव्यांचे वितरण असे विविध पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने देशी प्रजातींची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगत उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.
जॉगर्स असोसिएशनच्या वतीने लावलेल्या झाडांच्या संगोपनासाठी ड्रिप पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वृक्षांना नियमित पाणीपुरवठा होऊन त्यांची वाढ सुनिश्चित होणार आहे.‘एक झाड लावा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत मैदान परिसराची स्वच्छता, झाडांभोवती आळे तयार करणे, मैदानाच्या कंपाऊंडवर निसर्गचित्रे रेखाटणे आणि पर्यावरणपूरक घोषवाक्ये लिहिणे असे विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करत नागरिकांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी, बिल्डर्स असोसिएशनचे चेअरमन मनोज म्हेत्रस, व्हाईस चेअरमन हणमंत कुलकर्णी, सचिव यशवंत पाथरुट, खजिनदार सलिम दर्जी, माजी चेअरमन नामदेव म्हेत्रस, संतोष कलकुटगी, युवराज चुंबळकर, मल्लिकार्जुन कावळे, अशोक गांधी, दत्ता मुळे, अमर बिराजदार, अजय अन्नलदास, प्रशिक्षक सुर्याजी लिंगडे, रवी राठोड, संगीता जाधव, भारती लिंगडे, कोच मिहीर जाधव, जॉगर्स ग्रुपचे अध्यक्ष दिलीप कदम, संतोष कदम, मुन्ना राठोड, हेमंत जाधव, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सचे पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते, खेळाडू तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 21