सोलापूर : आई-वडिलांच्या संपत्तीवर नव्हे तर त्यांच्या विचारांवर आणि महामानवांच्या शिकवणीवर वारसा सांगणारी पिढी निर्माण झाली पाहिजे. यासाठी फुले-आंबेडकरवादी आणि बौद्ध अनुयायांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० च्या समादेशक डॉ. दिपाली काळे यांनी केले.
सतराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर समता सैनिक दलाच्या वतीने आयोजित धम्म संस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी भदंत सुमेध नागसेन महाथेरो यांची मंगल उपस्थिती होती. डॉ. काळे म्हणाल्या, भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची क्रांती समाजात रुजली पाहिजे. प्रज्ञा, शील, करुणा आणि विवेक ही मूल्ये प्रत्येकाच्या आचरणात आली तर पोलिसांचे कामच उरणार नाही. माणसाने माणसाशी माणुसकीने वागण्यासाठी आवश्यक विचार बाबासाहेबांनी मानवजातीला दिले आहेत.
भदंत सुमेध नागसेन महाथेरो यांनी शुद्ध आचरण, संस्कार आणि शिस्तीचे महत्त्व विशद केले. सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. डॉ. काळे यांनी समता सैनिक दलाच्या संचालनाचे निरीक्षण केले. बालकलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.प्रास्ताविक जीओसी शांतीकुमार कांबळे यांनी केले. मुख्याध्यापक वशिष्ठ सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन तर अण्णासाहेब भालशंकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाळासाहेब भोसले, बाळासाहेब मस्के, अनिल जगझाप, विनोद जाधव, चंद्रकांत कोळेकर, सुनील डांगे, सुमित्रा जाधव, सुनीता गायकवाड, संभाजी तळभंडारे, मुकुंद चंदनशिवे, प्रमोद जाधव, वर्षा जाधव, प्रीती जाधव, भारत आवारे आणि ज्ञानेश्वर प्रक्षाले यांनी परिश्रम घेतले.
नऊ मान्यवरांचा पुरस्काराने गौरव
दिवंगत पीएसआय केरू रामचंद्र जाधव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डॉ. दिपाली काळे यांना गुणवंत महिला पोलीस अधिकारी, ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड यांना विशेष जीवन गौरव, कामगार नेते अशोक जानराव यांना कामगार मित्र, सुनील डांगे व नागसेन माने यांना बौद्ध धम्म मित्र, विजय गायकवाड यांना गुणवंत पत्रकार, रत्नदीप कांबळे यांना सहकार भूषण, सुचित्रा थोरे यांना आदर्श धम्मकार्य आणि मंजुश्री खंडागळे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Post Views: 6