पंढरपूर – येथील माजी नगरसेवक विक्रम शिरसाट (पापरकर) यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा संदर्भातील विविध समस्या तसेच अडचणीं संदर्भातील मागण्यांचे निवेदन विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती प्रशासनाला दिले आहे. मंदिर समितीच्या वतीने समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी या निवेदनाचा स्विकार केला. मंदिर समिती मधील वरिष्ठ अधिकारी तसेच समितीच्या अध्यक्षां समोर निश्चितपणे आपल्या मागण्या मांडल्या जातील असे देखील आश्वासन व्यवस्थापक भोसले यांनी यावेळी श्री.पापरकर यांना दिले. या प्रसंगी श्री.पापरकर यांच्या समवेत समाजसेवक सागर बाबा तारापूरकर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून दर्शनासाठी येतात. मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर समितीच्या वतीने महाद्वार ते नामदेव पायरी व चौफाळा ते पश्चिम द्वार तसेच मंदिरा भोवती सावली करिता मंडप (कापडी शेड ) उभा करण्यात यावे. या बरोबरच भविकांचे पाय गर्मी मुळे भाजू नये या करिता मॅट टाकण्यात यावे.
तसेच पंढरपूर सभामंडप येथील बाथरूम हे पाण्या आभावी बंद अवस्थेत आहे. तरी ते त्वरित चालू करण्यात यावे. या बरोबरच बंद अवस्थेत असलेल्या बोअरवेल सुरु करावा व भाविकांची होणारी गैरसोय टाळावी.
तसेच मंदिर समितीच्या कंट्रोल रूम मधील काही कर्मचारी हे अरेरावीची व उध्दटपणाची भाषा वापरतात याचा प्रत्येय वेळोवेळी येतो अश्या वृत्तीवर वेळीच आळा घालण्यात यावा.
तसेच काही प्रकरणात भाविका ना शिस्तीचे पालन व्हावे या करिता कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असताना, त्या मध्ये गैर वर्तुणूक म्हणून समिती कडून विना चौकशी कार्यवाही केली जाते तरी त्यांच्या वर अन्याय होऊ नये आदी मागण्यां बाबतचा उहापोह श्री. पापरकर यांनी आपल्या या निवेदना मध्ये केलेला आहे.

















