अकलूज – वेळापूर येथील प्रख्यात कवी व साहित्य अभ्यासक प्रा. भारत कृष्णा गायकवाड यांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार” प्राप्त झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
तथागत भगवान बुद्धांची जन्मभूमी लुंबिनी येथे “भारत-नेपाळ सामाजिक समानता” या विषयावर बारावी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांवर आधारित विविध मान्यवरांची व्याख्याने झाली.
या परिषदेत देश-विदेशातील सुमारे ३६ ते ३७ मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामध्ये वेळापूर येथील प्रख्यात कवी व साहित्य अभ्यासक प्रा. भारत कृष्णा गायकवाड यांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार” जाहीर झाला होता.
प्रा. गायकवाड आरोग्य कारणामुळे परिषदेला उपस्थित राहू शकले नसल्याने, दि. ४ एप्रिल रोजी प्रा. गोरख साठे यांनी वेळापूर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला.
परिषदेला अध्यक्ष म्हणून प्रा. वैशाली देठे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात भगवान बुद्धांच्या समता व शांततेच्या विचारांचा जागतिक स्तरावर अवलंब करण्याची गरज व्यक्त केली.
दरम्यान, प्रा. गायकवाड यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक योगदानाबद्दल येत्या २३ मे रोजी दिल्ली येथे मानद पीएचडी जाहीर झाली आहे. मात्र प्रकृतीमुळे ते उपस्थित राहू शकत नसल्याने, ही पदवी १ जून २०२६ रोजी त्यांच्या निवासस्थानी आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.प्रा. भारत गायकवाड यांच्या कार्याचा सर्व स्तरांतून गौरव होत आहे.

















