सिद्धेश्वर फाउंडेशन आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी या अध्यायाचे ह. भ. प. श्री. काशीनाथ सर्जे यांच्या समवेत भक्तांनी दहा ते बारा अध्यायातील ओव्यांचे पठण केले.
आजच्या पारायणात ईश्वर सर्वत्र आणि सर्व रूपात भरलेला आहे. हा भाव मनात पक्का करणे म्हणजे विभूती योग होय. सर्व वस्तू व प्राणी मात्रांमध्ये भगवंतांचे अस्तित्व पाहणे हीच खरी भक्ती आहे असा संदेश दिला. तसेच गुरुस्तवन, मागील अध्यायांचे महत्व, ईश्वराचे मूळ स्वरूप आणि विभूती यांचे महत्व स्पष्ट केले. दहाव्या अध्यायातील ४२ श्लोक व ३३५ ओव्यांचे एकसुरात पठण केले. पुढे पठण करताना ज्ञानेश्वरीतील अकराव्या अध्यायाला विश्वरूपदर्शन योग म्हणून ओळखला जातो असे सांगितले. यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले विराट रूप दाखवले आहे. या अध्यायात ५५ श्लोकावर आधारित संत ज्ञानेश्वरांनी ७०८ ओव्यांमधून भावार्थ मांडला आहे. ईश्वराचे सर्वव्यापी रूप दिव्यदृष्टीने पाहिले असता ते भारावून गेले. चराचरातील सत्तेचे दर्शन त्यांना झाले.
पुढील पठणात बाराव्या भक्तीयोग अध्यायाचे पठण झाले. यामध्ये सगुण भक्तीचे महत्व व श्रेष्ठत्व विषद केले आहे. सगुण भक्ती ही ज्ञानमार्गापेक्षाही सोपी गोष्ट आहे. आनंददायी व ईश्वराला जवळ करणारी आहे. याबरोबरच भक्तांची सोय, ईश्वरांचे आश्वासन, भक्तीची पायरी आदी बाबींबाबत विवेचन केले.
दुपारी २ ते ७ या वेळेत पार पडलेल्या या पारायणात महिला भगिनींनी आज केशरी रंगाच्या साड्या परिधान करुन शोभा वाढविली.
पारायणाचा समारोप सतीश मालू परिवार, जुगलकिशोर करवा परिवार, शिवप्रकाश चव्हाण परिवार, मुकुंद भट्टड, सौरभ अंबुरे परिवार तसेच सौ. प्रतिमा जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते श्री आरती करण्यात आली.
आजच्या पारायणात सर्व भक्तांबरोबर वासुदेव व्हनकाबडे या दिव्यांग भक्ताने बाळे गावापासून स्वतः दुचाकी वाहनावर येऊन सहभाग घेऊन सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. जामगुंडी लॉन्स येथील पारायण सोहळा पाहून आजही शहरातील जुळे सोलापूर व शहर परिसरातील भाविकांनी हजेरी लावली. पारायणाचे सूत्रसंचलन राजेंद्र बलसुरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी इरण्णा अतनुरे, विजयकुमार भोगडे, जामगुंडी लॉन्सचे मॅनेजर संतोष कोळी, सिद्धाराम आलूरे, सिद्धेश्वर मेणसे, दीपक बच्चुवार, पंढरीनाथ अग्नीकर, भीमसिंग राजपूत आदींनी विशेष परिश्रम घेतले.