मंगळवेढा – नवरात्रोत्सवानिमित्त ज्योत आणण्याच्या नावाखाली दुचाकींवरून कर्णकर्कश सायलेन्सरचा आवाज करीत तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या तरुणांवर मंगळवेढा पोलिसांनी कारवाईचा दणका दिला आहे. या कारवाईत दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, अशा प्रकारची हुल्लडबाजी करणाऱ्यांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मंगळवेढा शहरासह तालुक्यात नवरात्रोत्सवाच्या काळात काही तरुणांकडून दुचाकींना बदललेले अथवा बेकायदेशीर सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात वाहने चालविण्याचे प्रकार वाढले होते. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा वाहनांमुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच लहान मुलांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलिसांनी विशेष मोहीम राबवून शहरातील विविध भागांत वाहनांची तपासणी केली. तपासणीदरम्यान कर्णकर्कश आवाज करणारे बदललेले सायलेन्सर बसविलेल्या दहा दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. संबंधित वाहनचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन व सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक तरुण दुचाकीवर वेगवेगळ्या प्रकारचे सायलेन्सर बसवून मोठा आवाज निर्माण करतात. या आवाजामुळे रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असून अपघाताचा धोका वाढतो. तसेच ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
अपघाताला आमंत्रण
ज्योत आणण्याच्या धार्मिक परंपरेला कोणाचाही विरोध नाही. मात्र, या निमित्ताने भरधाव वाहन चालविणे, स्टंट करणे, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरणे अथवा रस्त्यावर हुल्लडबाजी करणे हा प्रकार धोकादायक असल्याचे नागरिकांनी सांगितले. धार्मिक उत्सवाचा आनंद साजरा करताना कायदा, वाहतूक नियम आणि इतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
चौकट
यामाहा व बुलेट गाड्यावर दररोज कारवाई करणे गरजेचे आहे. फक्त सणांच्या वेळी कारवाई करू नये. रात्रीच्या वेळी अशा वाहनांमुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच नुकतेच जन्म झालेल्या लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे.
एक जेष्ठ नागरीक
Post Views: 14