नवी दिल्ली, 28 जून (हिं.स.) : नीट-यूजी परीक्षेच्या पेपरफुटीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज, शुक्रवारी विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यत तहकूब करावे लागले.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच आज, शुक्रवारी विरोधकांनी गदारोळ केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वप्रथम नीट परीक्षेच्या पेपरफुटीवर चर्चेची मागणी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट-यूजी पेपरफुटीवर चर्चेची मागणी लावून धरली होती. तर कामकाज पत्रिकेनुसार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यावाद प्रस्तावावर आधी चर्चा व्हावी असा आग्रह लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी धरला.
त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला आणि लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्याचवेळी राज्यसभेचे कामकाजही दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी खासदारांसोबत नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला आणि चर्चेची मागणी केली होती.