नवी दिल्ली, 28 जून (हिं.स.) : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार विक्रम मिस्त्री यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. यापूर्वी मिस्त्री यांनी चिनमध्ये राजदूत म्हणून काम केलेय. आगामी 15 जुलै रोजी मिस्त्री आपला पदभार ग्रहण करणार आहेत.
भारतीय परराष्ट्र सेवेचे (आयएफएश) 1989 बॅचचे अधिकारी असलेल्या विक्रम मिस्त्री यांनी यापूर्वी 3 पंतप्रधानांचे वैयक्तिक सचिव म्हणून काम केलेय. निवर्तमान परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांचा कार्यकाळ 12 मार्च रोजी संपुष्टात आला होता. परंतु, त्यांना 14 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता विक्रम मिस्त्री त्यांची जागा घेणार आहेत.
मिस्त्री यांनी चीनमध्ये राजदूत म्हणून केलेल्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलीय. त्यांनी 2019-2021 दरम्यान बीजिंगमधील राजदूत म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेषत: मे 2020 मध्ये लडाख प्रदेशात लष्करी संघर्षानंतर इजिप्तने चीनसोबत मध्यस्थी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका वठवली होती. यापूर्वी, मिस्त्री यांनी स्पेन (2014-2016) आणि म्यानमार (2016-2018) मध्ये राजदूत म्हणूनही काम केले आहे. त्यांनी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल (1997-1998), मनमोहन सिंग (2012-2014) आणि नरेंद्र मोदी (मे ते जुलै 2014) यांचे वैयक्तिक सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांनी बेल्जियम, पाकिस्तान, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, श्रीलंका आणि जर्मनी येथील भारतीय मिशनमध्येही काम केले आहे.