बार्शी – मुंबईतील ‘लॉर्ड्स युनिव्हर्सल कॉलेज ऑफ लॉ’ तर्फे आयोजित राज्यस्तरीय आंतर-महाविद्यालयीन ‘मूट कोर्ट’ (आभासी न्यायालय) स्पर्धेत बार्शीच्या समृद्धी आरगडे हिने ‘सर्वोत्कृष्ट वक्ता’ हा मानाचा पुरस्कार पटकावला. समृद्धी ही प्रथम वर्ष बी.ए. एलएल.बी.ची विद्यार्थिनी आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज, कायदेशीर संशोधन, युक्तिवाद आणि शिष्टाचाराचा अनुभव देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या स्पर्धेत नागरी पुनर्विकासाशी संबंधित पर्यावरणीय मुद्दे, घटनेतील कलम २१ नुसार मिळणारा निरोगी पर्यावरणाचा मूलभूत अधिकार, उच्च न्यायालयांचे कलम २६ मधील रिट अधिकारक्षेत्र आणि खासगी संस्थांचे कायदेशीर दायित्व यासारख्या गंभीर विषयांवर कायदेशीर पेच निर्माण करण्यात आला होता.
या स्पर्धेत समृद्धीने विविध घटनात्मक तरतुदी, कायदे आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या महत्त्वपूर्ण न्याय निर्णयांचे दाखले देत न्यायपीठासमोर अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली. ऐनवेळी निर्माण झालेल्या अनपेक्षित आव्हानांचा सामना करत तिने शांत आणि ठामपणे केलेला युक्तिवाद विशेष उल्लेखनीय ठरला. मुंबई उच्च न्यायालयातील अनुभवी विधिज्ञांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
Post Views: 18